अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून त्यांच्या बदलत्या भूमिकेसंबंधी टीका सुरू झाली आहे.
काँग्रेसने ठाकरे यांनी पूर्वी काढलेले एक व्यंगचित्र व्हायरल करून सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र देत ‘सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?’ असा सवाल केला आहे.
पूर्वी राज ठाकरे यांनी एक राममंदिरासंबंधी भाष्य करणारे एक व्यंगचित्र काढले होते. यामध्ये प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते.
‘राममंदिर’ नव्हे…!” असे म्हणत असल्याचे ठाकरे यांनी दाखविले आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असे लिहिले आहे. त्यावेळी ठाकरे यांची ही भूमिका होती, तर आता ते स्वत: अयोध्येला निघाले असल्याकडे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी? असे ट्वीट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे.