गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा!
सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी! शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू!
राजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी!
राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन् भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे.
शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.