‘महानंद’च्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन व दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाली.

राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध संघाच्या संचालक पदांवर राज्यातील दूध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वांची निवड होते.

यावर्षी भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमधील नेते स्पर्धेत होते. मात्र, सहकार सक्षमपणे टिकवून, तो वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्ध विकासमंत्री सुनील केदार व इतर नेत्यांनी ही निवड अविरोध करण्याचा निर्णय घेतला.

बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली संगमनेर विकासाचे मॉडेल ठरला आहे. येथील राजहंस दूध संघाची वाटचाल सहकाराच्या माध्यमातून यशस्वीरित्या सुरू आहे.

याच दूध संघाचे संचालक म्हणून रणजितसिंह देशमुख १५ वर्षांपासून काम करत आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मॉर्डन डेअरी फार्म, गाय पोळा, गायींसाठी आरोग्य शिबिरे, चारा व्यवस्थापन व स्वच्छता असे विविध उपक्रम हाती घेऊन राबवण्यात आले.

राजहंस दुधासह विविध उपपदार्थ त्यांचे दर्जेदार उत्पादन व विक्री यातून संघाचा लौकिक वाढवला. राजहंस संघामुळे संगमनेरची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाल्याने शेतकऱ्यांना विश्वासाचा जोड धंदा मिळाला आहे.

रणजितसिंह देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण कामाची दाखल घेत महानंद दूध संस्थेवर २०१६ मध्ये संचालक म्हणून निवड झाली, तर आता महानंदच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24