रेशन कार्ड धारकांना मिळणार साड्या ! शासन २४ लाख साड्या वाटणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. तुम्हा रेशनवर आता अन्नधान्याबरोबरच साडीही दिली जाणार आहे. होय हे खरे आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून लाभार्थ्यांना साडीवाटप केले जाणार आहे. हा लाभ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार आहे.

शासन सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक साडी देणार आहे. यानुसार जर आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात सुमारे २४ लाख ८० हजार ३८० नग साड्या उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली आहे. येत्या सोमवारपासून याचे वाटप सुरु होईल.

परंतु सध्या रेशन दुकानदार वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत. या साड्यांच्या रंगावरून वाद तर होणार नाहीत ना अशी चिंता त्यांना सतावत आहे. कॅटिव्ह मार्केट योजनेंतर्गत या साड्यांचे वाटप होणार असून राज्य यंत्रमाग महामंडळाच्या प्रतिनिधींकडे जिल्हानिहाय साड्या वाटपाची जवाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. २४ मार्चपर्यंत याचे वितरण करावयाचे आहे.

एकाच रंगाच्या साड्या देण्याची मागणी

साड्यांचा लाभ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार आहे. परंतु पिवळे कार्ड हे प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबियांसाठी वितरित केले असल्याने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीही साड्यांसाठी दावेदारी करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे साड्यावाटपाची प्रक्रिया ई-पॉस मशिनद्वारे केली जाणार असून अनेक लाभार्थी तेथे उपस्थित असणार आहेत. परंतु यावेळी साड्यांच्या रंगांवरून रेशन दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे शासनाने एकाच रंगाच्या साड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

दरम्यान या साड्या खराब होणार नाहीत या दृष्टीने त्यांची हाताळणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.