महाराष्ट्र

राऊतांनी शिवसेना संपत चालली आहे त्याची चिंता करावी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला चंद्रकांत पाटील हे प्रत्युत्तर देत म्हणाले की, संजय राऊत नशिबाने प्रसिद्धी झोतात आले आहेत.

त्यांनी माझ्या दृष्टीची चिंता करू नये. शिवसेना संपत चालली आहे त्याची राऊतांनी चिंता करावी. नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राउतांसारख्या नेत्याने आपल्या दृष्टीची चिंता करू नये, ती तपासायला भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे.

पण राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपद मिळवले, पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला? हे त्या पक्षाला समजत नाही.

तसेच तुम्हाला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत.

ते गेले 70 दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संप चालू असून 70 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत.

निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसानभरपाईही मिळत नाही.

असे असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असे संजय राऊत यांना वाटत असेल तर ठीक आहे, असा चिमटा त्यांनी काढला. तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे.

अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे.

त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली.

Ahmednagarlive24 Office