Pune News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात २७२ विहिरींचे पुनर्भरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : यंदा संपूर्ण जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती आणि पुरंदर हे तीन तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत. त्यामुळे विहीर पुनर्भरणाची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत.

जिल्ह्यात ४ हजार २७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र आहेत. त्यांपैकी २७२ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट या विहिरींमध्ये जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. जिल्ह्यात एकूण ६० हजार विहिरी आहेत. त्यांपैकी उतारावर असलेल्या ४ हजार २७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनासोबत वन, कृषी विभागाकडून पुनर्भरणासाठी आवश्यक ठिकाणे सुचवून ती तालुक्यांना कळविण्यात येत आहेत. हे काम ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. आतापर्यंत २७२ विहिरींची कामे झाली आहेत, अशी माहिती रोजगार हमी योजना शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी दिली.