अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय दहिफळे यांच्या खूनप्रकरणी एकूण अकरा ज़णांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे (वय २८ वर्षे), रा. दैत्यनांदूर,ता. पाथर्डी, राहुल शहादेव दहिफळे (वय २२ वर्षे) व भागवत हरिभाऊ नागरगोज़े (वय ५० वर्षे), या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, काल दि.१७ रोज़ी दैत्यनांदूरचे सरपंच संजय दहिफळे यांच्यावर निवृत्त माजी सैनिक शहादेव पंढरीनाथ दहिफळे यांनी गनने गोळया घातल्या होत्या. यामध्ये सरपंच संजय दहिफळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संजय यांचा पुतण्या ज्ञानेश्वर अशोक दहिफळे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून शहादेव (मेजर) दहिफळे व त्याचे वडील, पत्नी, मुले, भाऊ, पुतण्या व नातेवाईक, अशा अकरा जणांविरुद्ध खून करणे व खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविला आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दैत्यनांदूर येथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर संजय दहिफळे, ज्ञानेश्वर दहिफळे व फिर्यादी गणेश दहिफळे उभे होते. त्यावेळी शहादेव पंढरीनाथ दहिफळे तेथे आला व म्हणाला की, आता जिजाबा दहिफळे यांच्या कुंटुबाची गावात काही पत राहिली नाही व सरपंच संजय दहिफळे यांना शिवीगाळ करू लागला.
सरपंच संजय दहिफळे यांनी शहादेव याला तू शिवीगाळ का करतो, असे विचारले तरीही संजय यांना शिवीगाळ सुरूच ठेवली. भांडणाचा आवाज ऐकून शहादेवचा भाऊ विष्णू पंढरीनाथ दहिफळे व पुतण्या ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे तेथे आले. त्यांनी ज्ञानेश्वर अशोक दहिफळे याला लाथा बुक्याने मारहाण केली.
या वेळी मेजर शहादेव पळत त्याच्या घरी गेला व हातात चाकूव गन घेऊन आला. त्याच्या पाठोपाठ व्दारका भागवत नागरगोजे, अनिकेत भागवत नागरगोजे, विष्णूची पत्नी, शहादेवची पत्नी (नाव माहीत नाही), शहादेवचे दोन मुले, ज्ञानेश्वरची पत्नी व पंढरीनाथ दहिफळे तेथे आले.
या वेळी विष्णू दहिफळे याने कुऱ्हाडीने ज्ञानेश्वर अशोक दहिफळे यांच्या डोक्यात वार केला,परंतू हा ज्ञानेश्वरने वार उखवल्याने मानेवर वार लागला. शहादेव याने संजय दहिफळे यांच्या पाठीत चाकूने वार केला. तो चाकू गणेश याने हिसकावून फेकून दिला.
त्यानंतर शहादेवच्या पत्नीने संजय याचे हात धरले व शहादेवने गनमधून संजय यांच्यावर गोळ्या झाडल्या. संजयच्या डाव्या छातीत एक व हाताला एक अशा दोन गोळ्या लागल्याने तो खाली पडला. त्याला उचलून स्कॉर्पिओ गाडीतून पाथर्डी येथे उपज़िल्ह रुग्णालयात आणले.
तेथे उपचार करून संजय व ज्ञानेश्वरला नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. संजय दहिफळे यांचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचे डॉ. सांगितले. याप्रकरणी गणेश रमेश दहिफळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शहादेव पंढरीनाथ दहिफळे व त्यांच्या कुटुंबातील व नातेवाईक, अशा अकरा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे व खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, शहादेव दहिफळे या मारामारीत जखमी झाला आहे. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. शहादेव याची फोच्युन्युर चारचाकी गाडी कोरडगाव शिवारातून जप्त केली आहे. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांचा पहारा वाढविला आहे.