Malshej Ghat : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गेले १५ ते १६ दिवस मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण माळशेज घाटात धुके पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
घाटात धुके असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने माळशेज घाटातील निसर्ग आता फुलू लागला आहे. माळशेज घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरात पाऊस सुरू आहे.
त्यामुळे संपूर्ण माळशेज घाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुरबाड-माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात धुके पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला गाडीची लाईट लावून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन अशा प्रकारच्या सूचनासुद्धा टोकावडे पोलिसांनी केल्या आहेत. तसेच रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी आपल्या कुटुंबासमवेत येऊन येथील धबधब्यांचा आनंद व आस्वाद घेण्यासाठी व पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
या परिसरात पावसाचा जोर एवढा आहे की, समोर काही दिसत नाही, अशी परिस्थिती सध्या माळशेज घाटात पाहायला मिळत आहे. एखादा दगड जरी वरून खाली कोसळला तरी समजणार नाही. एवढे दाट धुके माळशेज घाटात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत माळशेज घाटात फिरायला जाताना अत्यंत काळजी घ्यावी, अन्यथा फिरायला जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. मुरबाड-माळशेज घाटात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टोकावडे पोलीस ठाण्यामार्फत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले.
तसेच ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. या सूचना फलकाचे पालन सर्व पर्यटकप्रेमींनी करावे. – सचिन कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक टोकावडे पोलीस ठाणे