Maharashtra News : माथेरानला येणारे पर्यटक आणि स्थानिक नेरळ- माथेरान घाटरस्त्याने प्रवास करतात. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या घाटरस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील प्रवासी वाहतूक धोकादायक बनू लागली असून, पर्यटकांची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले हे पर्यटन स्थळ समुद्र सपाटीपासून ८०३ मीटर उंचीवर आहे. येथे ४ महिन्यांत किमान ५ हजार मिलीमीटर पाऊस पडतो.
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने डोंगराची धूप होऊन घाटात दरडी कोसळत असतात. सतत कोसळत असलेल्या दरडीचा धोका कमी करण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी जाळी लावली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबत कार्यवाहीदेखील सुरू आहे.
यासाठी माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घाटरस्त्याची पहाणी केली. अर्थात प्रेरणा सावंत या गेल्या ४ वर्षांपासून माथेरान घाटात संरक्षण जाळी बसवावी म्हणून शासन दरबारी पाठपुरवा करत आहेत, तर दुसरीकड येथील सेवाभावी संस्था टॅक्सी चालकांचा पाठपुरावाही सुरू आहे.
माथेरानच्या घाटरस्त्यातील चांगभले मंदिराजवळ एक भला मोठा दगड धोकादायक अवस्थेत असून, त्या दगडाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून पाणी झिरपत आहे. हा दगड शनिवार-रविवारच्या काळात कोसळला तर माथेरान घाटरस्ता दिवसभर बंद राहू शकतो. त्यामुळे येथे आलेले पर्यटक अडकून पडतील व त्यांची गैरसोय होईल, हे कटू सत्य आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणची पहाणी केल्यावर या ठिकाणी १०० मीटर लांब आणि ८० मीटर रुंद लोखंडी जाळी बसवण्याचे कामाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी जाळी बसवण्याचे काम कधी सुरू होणार हा प्रश्न स्थानिक व पर्यटकांसमोर कायम आहे. त्यामुळे सध्या तरी माथेरान घाटातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे अशीच असल्याचे येथील नागरिक व पर्यटक बोलत आहेत.