‘त्या’ ‘मुख्याध्यापकांकडून ३० हजार वसूल करा’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील ठाकरवाडी परिसरात बेवारस आढळलेले तांदूळ व कडधान्य शालेय पोषण आहारातील असल्याचे निष्पन्न झाले.

माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या प्रगत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ते पाठवण्यात आले होते. शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने मुख्याध्यापक रामचंद्र ढेंबरे, तसेच भाऊसाहेब खामकर यांना दोषी ठरवले असून त्यांच्याकडून ३० हजार ३११ रुपये वसूल करण्यात यावेत,

तसेच सेवाशर्तीनुसार कारवाई करण्यात यावी, असे मत चौकशी समितीने सांगितले. ठाकरवाडी येथे ३ नोहेंबरला ३०० किलो तांदूळ, प्रत्येकी २० किलो वाटाणा, मूगदाळ व चवळी, तसेच १ किलो मिठाच्या पुड्या आढळून आल्या होत्या. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी किशोर माने यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशी समितीने या परिसरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह वनकुटे येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रगत विद्यालयातील शालेय पोषण आहाराचा साठा, प्रत्येक महिन्यात वापरण्यात आलेला साठा याची तपासणी केली. जि. प. शाळांमध्ये वापरलेला साठा व शिल्लक साठ्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.

प्रगत विद्यालयाकडून मात्र माहिती दडवण्याचा प्रयत्न झाला. समितीने शाळेची पाहणी केली असता बंद खोलीत, तसेच प्रांगणात किडलेला वाटाणा आढळला. मुख्याध्यापकांनी जून २०१४ ते मार्च २०२० दरम्यान प्राप्त, शिजवलेला व शिल्लक साठ्याबाबत अहवाल सादर केला. त्यात तफावत आढळली.

निर्जनस्थळी आढळून आलेला साठा व विद्यालयातील साठ्यात साम्य आढळले. अहवालामध्ये शिजवलेल्या नोंदीत कमी पडणारा माल लोकसभागातून प्राप्त झाला असे भासवण्यात आले‌. मुख्याध्यापकांनी चौकशी समितीस सहकार्य केले नाही. वाटप नियोजनातील बदलाची माहिती प्रशासनास दिली नाही व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीच्या उत्तरात ४ एप्रिलला झालेल्या सभेच्या इतिवृत्ताची नोटीस जोडण्यात आली. त्याच दिवशी मुख्याध्यापक टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल होते. शालेय पोषण आहार समितीची कोणतीही बैठक न होता मुख्याध्यापकांनी वस्तुस्थिती दडवून ठेवल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24