अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या तपासामुळेच बोठे पाटील यांच्या खरा चेहरा आज समोर आला आहे. रेखा जरे पाटील यांच्या हत्येची सुपारी नगर शहरातील पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिली असून बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नगर शहरातील यशस्वीनी बिग्रेड च्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सोमवारी (दि. ३०) नगर-पुणे रोडवर जातेगाव फाट्यानजीक हत्या झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस मुख्य सुत्रधाराच्या शोधात होते. गुरुवारी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत गुन्ह्याचा उलगडा केला.
या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी व्यतिरिक्त बाळ ज. बोठे (रा. बालिकाश्रम रोड) हा सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम चोळके याच्याकडून जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. बोठे आणि भिंगारदिवे या दोघांनी मिळून ही सुपारी दिली. या दोघांनी यापूर्वी देखील जरे यांना मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी बोठे याच्या घराची देखील झडती पोलिसांनी घेतली. त्या घरातून काही साहित्य जप्त करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. फरार बोठे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाले आहेत. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. 30 नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या त्यात मृत पावल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved