अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्याचे सुपुत्र तथा माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची राज्यपालांनी शुक्रवारी विधान परिषदेवर निवड केली.
त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून निष्ठावान, संयमी व अभ्यासू कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
गर्जे यांची निवड झाल्याचे कळताच शहरासह त्यांचे मूळ गाव दुलेचांदगाव येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. गर्जे यांच्या निवडीचे संकेत गुरुवारी मिळाले होते.
पक्षाकडून राज्यपालांकडे या दोन नावांची शिफारस करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गर्जे यांची पक्षात ओळख आहे.
शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात चांगले काम केल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी अकोले येथे प्राध्यापक म्हणून काम केले.
आदिवासींमध्ये शिक्षण जागृती चळवळ रुजवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्वतःच्या कार्यशैलीचा ठसा उमटवला.
शरद पवार यांच्या आग्रहाखातर त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या १९ वर्षांपासून पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळताना
संघटना, निवडणूक नियोजन या पातळीवर उत्तम कार्य करून पक्षाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
सहा वर्षांपूर्वी गर्जे यांनी काही काळ वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम केले. नगर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.
अत्यंत मितभाषी व धार्मिक वृत्तीचे ते आहेत. त्यांचे वडील यशवंत गर्जे यांना आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान होते. शास्त्री महाराज म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती.
पशू चिकित्साही ते उत्तम करीत. पदरमोड करत ते औषध देत. त्यांच्या हाताला गुण चांगला होता. तो वारसा चालवत जीवनात शिवाजीराव कार्यरत आहेत.