महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : राज्यातील राजकारणातील राजहंस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राजकारणात स्वकर्तृत्वाने भरारी घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यातील राजकारणातील राजहंस ठरले आहेत. राज्याच्या नेतृत्वात लोकमान्य, कर्तृत्ववान व संस्कारशील नेतृत्व म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. मंत्री थोरात राजकारणातील अष्टपैलू, अजातशत्रू लोकनेते ठरले आहेत.

सहकाराचे किमयागार थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून बालपणातच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाळासाहेबांना संत सावलीमधून समृद्ध विचारांचे संस्कार मिळाले. कायद्याचे शिक्षण घेत असताना पाणी पंचायतद्वारा पाणीप्रश्­नांवर सभा घेऊन जनजागृती केली.

मीटर हटाव, परीक्षा फी माफी अशा चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. १९७८ साली जोर्वे येथे अमृतवाहिनी सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना करून आपल्या राजकीय कारकिर्दीची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा प्रसार केला. यातूनच तालुक्यातील जनतेला आर्थिक बळकटी मिळाली. १९८० साली विडी कामगारांच्या प्रश्­नांवर नऊ दिवस कारावासही भोगला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेऊन चळवळवृत्तीचा बाणा दाखवून दिला.

१९८५ मध्ये जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष म्हणून विधानसभा लढविली व विधानसभेत सर्वांत कमी वयाचा आमदार म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ झाला. सन १९९९ मध्ये राज्य मंत्रीमंडळातील समावेशाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय मिळाला.

पाणी हेच जीवन माणून उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामाला त्यांनी गती दिली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या कामाची सुरुवात बाळासाहेबांनी निळवंडे धरणापासूनच केली. संगमनेर तालुक्याबरोबरच उत्तर नगर जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्याला निळवंडेचे पाणी मिळाले पाहिजे, याकरीता त्यांनी आपले मंत्रीपद पणाला लावून या धरणाच्या उभारणीचे काम केले.

‘आधी पुनर्वसन मग धरण’ पद्धतीने निळवंडे धरण प्रकल्पाला चालना दिली. स्वत:ची पाच एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना देऊन या कामाचा प्रारंभ केला. त्यामुळे त्यांनाच निळवंडेचे श्रेय जाते. पाटबंधारे खात्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करताना या खात्याला नवी दिशा दिली. राज्यातील अनेक रखडलेले प्रश्­न मार्गी लावले. अनेक दिवसांनंतर उजाड माळरान हिरवेगार दिसू लागल्याने शेतकरी, जनसामान्यामध्ये नवा अशावाद निर्माण झाला. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील प्रलंबित चारीचा प्रश्­न सोडविला.

शेतकऱ्यांनी त्यांना शेतकरी मित्र पुरस्कार देऊन गौरविले. २००४ मध्ये कृषी जलसंधारणसारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आली. शेतकरी पुत्रास हा बहूमान मिळाला. पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले. वेगवेगळ्या भागात कृषी मेळावे, प्रत्यक्ष शेतपाहणी, नवननवीन कृषी विद्यापीठचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले. या खात्याला नवी झळकी मिळाली. सन २००८- २००९ साली राज्यात विक्रमी कृषी उत्पादनाची नोंद झाली. महापीक योजना, कृषी सप्ताह, कृषी दिंडी, जलसंधारणाची कामे, एक लाख शेततळी असे विविध उपक्रम राबवून दुसऱ्या कृषी औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली.

कृषी व शिक्षण ही प्रगतीच्या रथाची दोन चाके असलेली खाती एकत्रपणे महसूलमंत्री थोरात यांनी यशस्वीपने सांभाळली. या खात्यांचे काम पाहाताना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व गरिबांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे, हे काम महसूलमंत्री थोरात यांनी केले. राज्य मंत्रीमंडळात पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, खारजमीन, शिक्षण, राजशिष्टाचार, रोहयो व महसूल अशी आठ खाते सांभाळलेले अजातशत्रू अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे महसूलमंत्री थोरात आहेत.

अमृत उद्योग समूहातील प्रत्येक संस्थेच्या प्रगतीसाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. संगमनेर येथील साखर कारखाना, दुध संघ, इंजिनिअरींग कॉलेज, शॅम्प्रो, शेतकी संघ, सह्याद्री शिक्षण संस्था सक्षमपणे उभ्या असून नावारुपास आलेल्या आहेत. संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महसूलमंत्री थोरात यांनी विविध योजना राबविल्या आहेत. संगमनेर शहराचा बायपास रस्त्याचा प्रश्­न मार्गी लावला असून शहरात भव्य क्रिडांगण उभारले.

संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय महसूलमंत्री थोरात यांनाच जाते. विकासाची नवी दृष्टी देताना त्यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्थांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी राज्याला आदर्शवत ठरली आहे. अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत मंत्री थोरात यांनी पक्षाचे बळकटीकरण केले. त्यामुळेच सर्वमान्य ठरलेले त्यांचे नेतृत्व आता राष्ट्रीय बनले आहे. ना. थोरात हे राजकारण व सहकारातील राजहंस ठरले आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!

अहमदनगर लाईव्ह 24