महाराष्ट्र

Bhandardara News : तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू ! अर्धवट कामामुळे पर्यटकांना मनस्ताप

Published by
Ahmednagarlive24 Office

Bhandardara News : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला निसर्ग पर्यटनासाठी हजारो पर्यटकांनी भेट दिली. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रंधा धबधबा ते वारंघुशी फाटादरम्यान रस्त्याचे काम अर्धवट केल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा पर्यटनस्थळावर रंधा धबधबा ते वारंघुशी फाटा या दरम्यान दोन ते तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात असतानाच भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने एका बाजुला रस्त्याचे काँक्रीटीकरण केले असून दुसरी बाजु खोदून ठेवण्यात आली आहे.

वाहतुक कोंडी कायमस्वरुपी

भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने सर्वच्या सर्व पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. पर्यटकांकडे स्वतःचे वाहन असल्याने या ठिकाणी वाहतुक कोंडी कायमस्वरुपी होत आहे. रस्ता एका बाजुने सुरू आहे. दुसऱ्या बाजुने खोदलेल्या रस्त्यामध्ये मोठे चारचाकी वाहन बसत नसल्याने वाहनाच्या टायरचे मोठे नुकसान होत आहे.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण

काही पर्यटक काँक्रिटच्या रस्त्यावरून दोन्ही बाजुने वाहने नेतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ठेकेदाराने हा रस्ता खोदताना पुढे पावसाळा तसेच पर्यटनात होणारी गर्दी लक्षात घेता काम लवकर करणे गरजेचे होते. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. या रस्त्याचे काम अहमदनगर येथील एका ठेकेदारास काम दिले आहे. शेंडी येथेही भरचौकात एका बाजुला रस्ता अपूर्ण ठेवल्याने याही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

पर्यटक जमा झाल्याने वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा गजबजुन गेले होते. शनिवारी पाऊस कोसळत असल्याने अनेकांनी मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला; मात्र रविवारी पावसाच्या गैरहजेरीमुळे अनेकांचा हिरमोड झाला. अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांनी वसुंधरा धबधबा, कोलटेंभे फॉल, नेकलेस फॉल, नान्ही फॉल, सांदनदरीचा रिव्हर्स धबधबा या ठिकाणांना पसंती देताना दिसून आले. भंडारदरा धरणाच्या सांडव्याच्या परिसरात प्रचंड पर्यटक जमा झाल्याने वाहतूक कोंडी बराच काळ टिकून होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office