नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना व मित्रपक्षाच्या महायुतीचाच विजय होईल. रिपब्लिकन पक्षाने १० जागांची मागणी केली असून रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही.
आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढू, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नागपुरात आले असता आठवले यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. महायुतीला २४० जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. भाजपाच्या विजयात रिपाइंचाही वाटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील धार बोथट झाल्यामुळे विरोधक आता ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सत्ता आली तेव्हा कुणीच यावर बोलले नाही.
मात्र, केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा ईव्हीएमविरोधात विरोधक बोलू लागले. निवडणुका मतपत्रिकेवर घ्यायच्या की ईव्हीएमवर घ्यायच्या हा निर्णय निवडणूक आयोगाला करायचा असल्याचेही आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.