Marathi News : काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे समोर आले होते. तसाच काहिसा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे.
खडेगोळवली, कैलासनगर परिसरातील साईबाबा मंदिरात नंदी चक्क दूध आणि पाणी पीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफवा पसरताच असंख्य भाविकांनी दूध, पाणी घेऊन मंदिराकडे धाव घेतली.
काही महिलांनी तर नंदीने आमच्या हाताने दूध पायल्याचे सांगितल्याने या गर्दीत अधिकच वाढ झाली. रात्री उशिरा अखेर मंदिर बंद झाल्यावर ही गर्दी ओसरली. खडे गोळवली येथील कैलासनगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात असलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यामुळे हा चमत्कार अनुभवण्यासाठी असंख्य भाविकांनी पाणी व दूध घेऊन गर्दी केली. भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पुजाऱ्याने पूजा केली. त्यानंतर नंदीच्या मूर्तीच्या तोंडाजवळ दुधाने भरलेला चमचा ठेवताच नंदी दूध प्राशन करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पुजाऱ्याने ही बाब मंदिरातील भाविकांना सांगितल्यावर काहींनी त्याचा व्हिडीओ काढला. नंदी दूध पीत असल्याचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली.
जमलेल्या भाविकांनी नंदीच्या मूर्तीला दूध देण्यास सुरुवात केली. एकेक करत वाट्या, ग्लास इत्यादींमध्ये दूध घेऊन भाविक मंदिरात पोहोचले आणि चमच्याने नंदीच्या मूर्तीला दूध, पाणी पाजू लागले. रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते.