तुम्ही सेम टू सेम माणसे पाहिलेत का? नक्कीच पाहिले असतील. शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांचे असे डबल रोल त्यांच्या वाढदिवसाच्या पाहायला मिळतात. अगदी धोनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी यांचे देखील सेम टू सेम माणसे पाहायला मिळाली होती. आता थेट मनोज जरांगे पाटलांचाच डुप्लिकेट आलाय.
होय अगदी खरंय. अगदी त्यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे. रामेश्वर घोंगडे असे व्यक्तीचे नाव आहे. ते धनगर समाजाचे असून मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी ते नेवाशात झालेल्या सभेत ते आले होते. त्यांना पाहूनच चर्चा सुरु झाल्या. लोक त्यांच्या सोबत फोटो काढत होते.
काय म्हणाले डुप्लिकेट जरांगे अर्थात रामेश्वर घोंगडे
रामेश्वर धोंगडे यांनी असे म्हटले आहे की, मी धनगर समाजाचा आहे परंतु मी मराठा समाजाच्या पाठीशी आहे. त्यांना माझा सपोर्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही धनगर समाजाचीही भावना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसून एकदिलाने लढू, तसेच माझी जरांगे पाटील यांना भेटण्याची खूप इच्छा आहे, त्यांना अजून मी भेटलो नाही. त्यांना भेटल्यावर मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहे असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आक्रमक
मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील अजूनच आक्रमक झाले आहेत. शासनाने जरी आरक्षणासाठी डेडलाईन दिली असली तरी सध्या त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सध्या ते मराठा समाजाच्या बांधवांच्या भेटीगाठी घेत असून चर्चा करताहेत. सभा घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील त्यांनी तीन जाहीर सभा घेतल्या. राज्यभर त्यांचे दौरे सुरु आहेत.