अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितली गेल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगणाऱ्या प्रभाकर सैल याने समीर वानखेडेंबाबत नवा दावा केला आहे.
या खंडणी प्रकरणात समीर वानखेडे हेही सहभागी होते, असे प्रभाकर सैल याने चौकशीत सांगितले आहे. सोमवारी प्रभाकर सैल याची सुमारे १० तास चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमचे प्रमुख उपमाहसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे मंगळवारी प्रभाकरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सॅम डिसूझा, मनिष भानुशाली, समीर पाटील यांच्यासारख्या अनेकांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. प्रभाकर सैलचे वकील तुषार खंडाळे यांच्या माहितीनुसार, सैल यांचा जबाब एनसीबी नोंदवून घेत आहे.
आर्यन ड्रग्ज प्रकरण हा मोठा कट असून, यात पैशांच्या खंडणीसाठी हे सर्व करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. यात केवळ समीर वानखेडे नाहीत, तर एनसीबीचे आणखीही काही जण यात सामील असल्याची शक्यता खंडाळे यांनी व्यक्त केली आहे. एनसीबीची एसआयटीची टीमही सैल यांची चौकशी करु इच्छिते असे आम्हाला सांगण्यात आले आहे,
मात्र त्यासाठी आधी नोटीस पाठवावी, असे एनसीबीला सांगितिल्याचे खंडाळे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सरकारने एफआयआर दाखल करावी, अशी आमची मागणी आहे. बांद्र्यामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये एनसीबीच्या तात्पुरत्या कार्यालयात प्रभाकर सैल याची चौकशी करण्यात आली.
उशिरा रात्री तो बाहेर पडला, मात्र त्याने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनीही चौकशीबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाचा अंतिम हवाल आम्ही सर्वांसमोर मांडू, असे त्यांनी सांगितले.