अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या धमाल लावणी नृत्यावर संगमनेरकर फिदा झाले. अमृतवाहिनी मेधा सांस्कृतिक महोत्सवातील हा गर्दीचा विक्रम मोडणारा कार्यक्रम ठरला.
संस्कृती बालगुडे हिच्या धमाकेदार मिक्स लावण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. सतत टाळ्यांचा व शिट्ट्यांचा गजर सुरू होता. आकर्षक विद्युत रोषणाई, सजलेला परिसर, जोडीला गुलाबी थंडी यामुळे आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
सामूहिक नृत्य, फॅशन शो, वादन व कॉमेडीने विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. देवीच्या गोंधळाचे सादरीकरण अप्रतिम ठरले. लावणी, भांगडा, बिहू नृत्य, गोंधळ, फ्यूजन डान्समध्ये विद्यार्थ्यांनी धमाल केली.
अकोले महाविद्यालयाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याने भारतीय संस्कृतीतील विविधता दर्शवली. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मुलींवरील अॅसिड फेक हल्ल्यानंतर त्या मुलीच्या जीवनातील दुर्दशेच्या केलेल्या सादरीकरणाने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणले.
इंजिनिअरिंग कॉलेजने सादर केलेले राजा शिवछत्रपती न्याय व्यवस्था अप्रतिम ठरले. मुंबई, नगर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, पुणे येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमास संचालिका शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब लोंढे, एस. टी. देशमुख, डॉ. मनोज शिरभाते,
डॉ. मच्छिंद्र चव्हाण, जे. बी. शेट्टी, शीतल गायकवाड, प्रा. विलास शिंदे, प्रा. ए. के. मिश्रा, अशोक वाळे, विजय वाघे, नामदेव गायकवाड, डॉ. राकेश रंजन, राकेश हांडे आदी उपस्थित होते.