Maharashtra news:मातोश्रीमध्ये बैठक झाली की बाहेर येऊन त्याची प्रसारमाध्यमांना माहिती देणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आज वेगळ्याच मूडमध्ये पहायला मिळाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेण्यासाठी मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली, या बैठकीतून बाहेर पडलेले राऊत प्रसारमाध्यमांना टाळून मातोश्रीवरून त़डक रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार आतील बैठकीत ते एकटे पडल्याचे सांगण्यात येते.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये संजय राऊत वगळता उर्वरित खासदारांनी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची भूमिका मांडली.
त्या आदिवासी असल्याने त्यांना मतदान करावे, अशी मागणी खासदारांनी केली. यावर ठाकरे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र, खासदारांची ही भूमिका राऊत यांना मान्य नसल्याचे सांगण्यात येते.
असे असले तरी आता ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुर्मु यांना मतदान केले तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होणार. खासदारांचे ऐकले नाही तर ते नाराज होऊन शिंदे गटाला जाऊन मिळणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.