जनावरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा

Maharashtra News

Maharashtra News : शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेणखता सारखे दुसरे चांगले खत नाही, आलिकडील काळात गुरा- ढोरांची संख्या कमी होत असल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे.

हमखास उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेणखताला प्राधान्य देतात. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या कमी होत आहेत. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे.

जनावरांच्या किमती वाढल्याचा फटकाही पशुपालकांना बसला आहे. चाऱ्याचे वाढते भाव व पाणी टंचाईमुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देतात, त्यामुळे सध्या शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध आहे, ते स्वतःच्या शेतात टाकण्यास प्राधान्य देतात व त्यांची गरज भागल्यावर शेणखताची विक्री करतात.

त्यामुळे सध्या शेतकरी शेणखताच्या शोधात आहेत. काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. तीन ते साडेतीन हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली, या दराने सध्या शेणखताची विक्री सुरु आहे. परंतु हा भाव देऊनही मुबलक शेणखत मिळण्याची खात्री नाही.

रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे, दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने त्याचा जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होत आहे.

शेणखताचा तुटवडा, सेंद्रीय खतांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे नैसर्गिक शेती कसणे शेतकऱ्यांना शक्य नाही, तरीही काही मोजके शेतकरी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, हिरकीची खते आदी सेंद्रीय खातांचा वापर करतात, तेही शेतात घरच्या पुरते अन्नधान्य व भाजीपाला पिकविण्याकरीता करताना दिसतात.

मोठे शेतकरी शेतात प्रत्येकी तीन वर्षांनतर शेणखताचा वापर करतात. काही शेतकरी जमिनीची सुपिकता वाढावी म्हणून तळ्यातील गाळ किंवा नदीकाठची तांबडी माती आणून त्याचा वापर करीत आहेत. सध्या तरुण पिढी शेतात राबत आहे. वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये केले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe