अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांची संघटना तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात विविध प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला.
तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्मचारी संघटनांसोबतच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सातवा वेतन आयोग आणि १० वर्षांचा करार यावर विचार होऊ शकतो, पण संप मागे घ्या असेही त्यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ मूळ वेतनात दिलेली आहे.
आज काही कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कोणताही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्यावर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
एसटी महांडळाच्या विलीनीकरणावर चर्चा झाली. काही जाचक अटींवर चर्चा केली जाईल. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदार घेऊ.
पण कोणतीही बेशिस्त खपवून गेतली जाणार नाही, याची माहिती आम्ही आज कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली, असे अनिल परब म्हणाले.