शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने गेल्या कित्येक वर्षापासून भारतातील शेतकरी करतात. परंतु कालांतराने यामध्ये प्रगती होत शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करू लागला आहे.
अगदी हीच बाब पशुपालन व्यवसायाला देखील आता लागू होताना दिसून येत आहे. ज्याप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला अगदी त्याचप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता शेतकरी करत आहे.
मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेऊन डेरी व्यवसायातून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती मिळवली आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण जालना तालुक्यात असलेल्या निधोना परिसरातील डॉ.आंबेडकर नगर येथील शेतकरी तुकाराम शहापूरकर यांची पशुधनाची यशोगाथा पाहिली तर ती वाखाणण्याजोगी आहे.
चाळीस पंढरपुरी म्हशींच्या पालनातून दूध व्यवसायामध्ये चांगली प्रगती केली आहे व ते महिन्याकाठी साडेचार लाखांची कमाई या माध्यमातून करत आहेत. नुसता शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहतात शेतीला वेगवेगळ्या व्यवसायाची जोड देऊन आर्थिक उन्नती साधने हे खूप महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिलेले आहे.
तुकाराम शहापूरकर यांनी म्हैस पालनातून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना तालुक्यातील निधोना परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेले शेतकरी तुकाराम शहापूरकर यांच्याकडे त्यांची घरची 18 एकर शेती आहे. घरातील चार सदस्य त्यांच्या या 18 एकर शेतीचे संपूर्ण नियोजन करतात. परंतु निसर्गाची अवकृपा म्हणजेच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे बऱ्याचदा शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते व अशा प्रकारच्या नुकसानीचा फटका शहापूरकर कुटुंबाला देखील बऱ्याचदा बसला.
या माध्यमातून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे यात कुठेतरी काही बदल करावा हे त्यांच्या मनात सुरू होते व त्या दृष्टिकोनातून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. याकरिता त्यांनी सुरुवातीला एक म्हैस विकत घेतली व दूध व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये हळूहळू वाढ करत आज त्यांच्याकडे 40 म्हशी असून त्या म्हशीसाठी अत्याधुनिक पद्धतीचा गोठ्याची उभारणी केलेली आहे. या 40 म्हशीकरिता संपूर्ण दिवसभरात ओला चारा, मुरघास यावर चार हजार रुपये खर्च येतो व हा खर्च वजा करता दिवसाला या म्हशींच्या दुधातून त्यांना पंधरा हजार रुपयांचे तर महिन्याला साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
गोठ्यातील त्यांच्या या 40 म्हशीपासून सकाळी 150 लिटर तर सायंकाळी 100 लिटर दुधाचे उत्पादन मिळते. या दुधाची विक्री ते मोटरसायकलच्या माध्यमातून जालना शहरातील हॉटेल्स तसेच घरोघरी जाऊन करतात. या म्हशीच्या एक लिटर दुधाला साठ ते सत्तर रुपयांचा दर मिळतो व त्यामुळे 250 लिटर दुधातून एका दिवसात 15 हजार रुपयांची कमाई होते.
म्हशीची कशी घेतली जाते काळजी?
त्यांच्या या उभारलेल्या अत्याधुनिक गोठ्यामध्ये 40 म्हशी असून उन्हाळ्यामध्ये त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्राचे शेड बांधण्यात आले असून त्यामध्ये दहा पंख्यांची सोय करण्यात आलेली आहे. या म्हशीची काळजी दिवसभर घेता यावी याकरिता त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्ती दिवसभर त्या ठिकाणी कष्ट करतात.
त्यांची दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून सुरू होते व पाच वाजेला ते शेण काढण्यापासून कडबा कुट्टी करणे, चारा टाकणे तसेच गोठ्याची व जनावरांची स्वच्छता करण्याला जास्त महत्त्व देतात. तसेच या 40 म्हशींना एका दिवसाला शंभर पेंढी चारा व एक क्विंटल ढेप लागते. या सगळ्यावर दररोज चार हजार रुपये त्यांना खर्च येतो.