मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे काही सत्ता नाट्य झाले ते उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे.
त्या सत्ता नाट्यवेळी ज्या काही गोष्टी पडद्या मागे घडल्या त्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात सुधीर सूर्यवंशी यांनी प्रकाशित केल्या आहेत.
यात त्यांनी बीजेपीला धक्का देण्याचा प्लॅन कोठे व कसा शिजला हे सांगितले आहे.
शरद पवार आणि संजय राऊत यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या गुप्त भेटीत भाजपला धक्का द्यायचा प्लॅन आखला गेला असा गौप्य स्फोट केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादी विरोधी बाकांवर बसणार, असे स्पष्टपणे सांगितले. या पत्रकारपरिषदेनंतर शरद पवार त्यांच्या पत्नीसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ने जात असताना पनवेलजवळच्या McDonald’s आऊटलेटजवळ पवारांनी आपली गाडी थांबवली. त्याठिकाणी संजय राऊत पवारांची वाट पाहत थांबले होते. यानंतर संजय राऊत पवारांच्या गाडीत बसले. यानंतर पवारांची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. राऊतांची गाडीही त्यांच्या पाठी येत होती.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात तळेगाव टोलनाक्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे तासभर चर्चा सुरु होती. यावेळी राऊत यांनी आपण एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवू, असा प्रस्ताव पवारांसमोर मांडला.
जेणेकरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. राऊतांच्या या प्रस्तावानंतर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याचे कबूल केले. मात्र, तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलायला सुरुवात करा, अशी सूचना पवारांनी राऊत यांना केली.
यानंतर तळेगाव टोलनाक्याजवळ संजय राऊत पवारांच्या गाडीतून उतरले आणि पुन्हा आपल्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी पवारांशी झालेली बोलणी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली.