औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारवर कितीही टीका होत असली तरीही हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि अशीच आघाडी देशपातळीवर झाल्यास लोकांच्या मनातील मराठी माणूस पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि.४) येथे व्यक्त केला.
साहेब अजूनही ‘तरुण’ आहेत, असा शब्दप्रयोग त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांच्या सेवागौरव सोहळ्यात आमदार पवार बोलत होते. नेत्याचे कार्यकर्त्यांवर आणि कार्यकर्त्यांचे नेत्यावर प्रेम असेल तर काहीही होऊ शकते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे.
मात्र नेत्याचा कार्यकर्त्यांवर विश्वास नसेल तेव्हा स्वत:चे जोडे स्वत: उचलावे लागतात, असा टोला त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्रात झालेली महाविकास आघाडी देशात झाली तर लोकांच्या मनातील मराठी माणूस पंतप्रधान झाल्याखेरीज राहणार नाही. त्यासाठी आपण एकत्रित राहणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.