मुंबई :- अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. ‘जे पेरले तेच उगवले; स्वत: शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे’,
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी सत्ता स्थापन केली होती.आता पुतणे अजित पवार यांनीच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखले आले.
या घटनेने स्व. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला आता चिरशांती लाभली आहे,’ अशी प्रतिक्रिया वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी दिली.शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री शालिनीताई म्हणाल्या की,
‘आजवर विश्वासघातकी राजकारण करणे पवारांना नडले असून राष्ट्रवादीमधील बंडाळीला प्रामुख्याने शरद पवार हेच जबाबदार आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांचाच आदर्श घेतलेला आहे.पूर्वी वसंतदादा यांचा विश्वास शरद पवारांच्यावर पूर्ण होता. या वेळी शरद पवारांचा विश्वास अजित यांच्यावर होता म्हणूनच त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. तरीदेखील अजितदादांनी पाठीत खंजीर खुपसला.
४० वर्षांपूर्वी वसंतदादांना काय मानसिक त्रास झाला असेल याची अनुभूती शरद पवारांना आली असेल. जिथे पाप कराल तिथेच फेडावे लागते, असा नियतीचा नियम आहे,’ असा टाेलाही शालिनीताईंनी लगावला आहे.शालिनीताई पाटील म्हणाल्या,”१९७८ ला शरद पवारांनी हेच केलं होत.वसंतदादा पाटील यांना काही आमदारांवर शंका होती.यावेळी शरद पवार यांनी त्यांना सर्व काही ठीक असून मी सोबत असल्याचे सांगितले.
परंतु जेव्हा सभागृह सुरू झाले तेव्हा पवार १७ ते १८ आमदार घेऊन विरोधी नेत्यांसोबत बसले होते.ते पाहून वसंतदादा पाटील यांनी तत्काळ राजीनामा दिला.”शरद पवार यांनी समोरासमोर केलं असत तर चालले असते.परंतु ते मराठ्या सारखे लढले नाहीत.त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला.आता त्यांचीच पुनरावृत्ती होत आहे.”