Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आजची मुलं शिक्षणानंतर पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही. मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे मला फोन आला.
आमच्या घरी जेवायला या. मी विचारले तुम्ही इथं कसं तर त्या मुलीने सांगितले आम्ही इथे नोकरी करतो. मी म्हणालो अभिनंदन. ती म्हणाली घरी या. मी विचारलं कुठे राहतेस? तर म्हणाली शिकागो! मी म्हटलं इतक्या लांब? ती म्हटली आमचं विमान पाठवते.
हे सगळं शिक्षणामुळे घडले, शरद पवार म्हणाले, मी स्वत: बारामतीत शिकलो. माझे सर्वात चांगले शिक्षक होते ते कलंदर शेख. कलंदर मास्तर! त्यांनी आम्हाला प्रोत्साहीत केले.
शिक्षणासह सार्वजनिक कामात लक्ष द्यायचे हे त्यांनी आम्हाला शिकवले, आता त्या मुलीला विमान घेण्याइतपत यश मिळण्यामागे तिच्या शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, बारामती शैक्षणिक केंद्र व्हावं ही माझी इच्छा होती. आता ते प्रत्यक्षात येतंय याचा आनंद आहे. राज्यात मी, अजितदादा, सुप्रिया आणि सहकारी शैक्षणिक क्षेत्रात लक्ष घालतो. तसेच संस्था चांगल्या प्रकारे चालवतो.
त्याचा गाजावाजा करत नाही. सुप्रिया सुळे 9 उत्तम शाळा चालवतात. त्यात 2 आदिवासींसाठी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आज या संस्थेने लाखो विद्यार्थी शिकत आहेत. कोणाकडून डोनेशन घेतले जात नाही.
रयतचा मी अध्यक्ष, जिथे 4 लाख विद्यार्थी. सहा ते साडेसहा लाख विद्यार्थी माझ्याशी संबंधित संस्थेत शिकतात. डोनेशन घ्यायचे नाही. जो प्रथम येईल त्याला प्राधान्य हे आमचे धोरण असल्याचे देखील पवार म्हणाले.