महाराष्ट्र

Milk Rate : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ! दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर

Published by
Ahmednagarlive24 Office

Milk Rate : राज्य सरकारने १४ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय काढून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र हा निर्णय दूध संघांकडून पाळला जात नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या २५ ते २७ रुपयांचा दर दिला जातो. याविरोधात शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी अकोले येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील आठवड्यात डॉ. नवले व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुग्धविकास व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली होती.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडून तातडीने कारवाई अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दूध संघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू.

दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दुधासारखा नाशवंत पदार्थ रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करून घ्यावी.

दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. थोरात यांनी मंगळवारी अकोले येथे दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

दुधाचा विषय हा गरीब माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. २५ ते २८ रुपये लिटरने गायीचे दूध विकणे शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. राज्य सरकारने या विषयावर सामोपचाराने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

दूध दराच्या प्रश्नावर सरकारी हस्तक्षेपाची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना किमान ३४ रुपये लिटरप्रमाणे दुधाचा भाव मिळण्यासाठी गरज पडल्यास सरकारने मदत करावी, असे थोरात यांनी यावेळी सांगितले.

Ahmednagarlive24 Office