शेवगाव- पावसा अभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्क्यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.
तालुक्यातील आव्हाणे बु. येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काका नरवडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, पं. स. सदस्या मनिषा कोळगे, सरपंच संगीता कोळगे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, ऍड. विनायक आहेर, डॉ. सुधाकर लांडे, नारायण बैरागी, रघुवीर उगले, वसंत भालेराव, उपसरपंच सुधाकर चोथे, शिवाजी आहेर आदी प्रमुख उपस्थित होते.