स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे.

शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत पक्षात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यासंदर्भात त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले की, 1 ऑक्टोबर रोजी नगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदे भरली जाणार आहेत.

आजपर्यंत स्व.अनिलभैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. म्हणूनच शहरामध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली.

परंतु काही दिवसांपासून जातीचे राजकारण पक्षात सुरु झाले आहे. यातूनच स्व.अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केले गेले. आजही स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले जात आहेत.

आपण यात लक्ष घालावे. नगर शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीयवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम सुरु केले आहे.

तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे व नगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा पुढील काळात आपल्या शिवसेनेला मोठी किंमत मोजवी लागणार आहे, असे शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24