अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- देशभरातील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन दिल्लीत उभे राहिले आहे. अभूतपूर्व असे समर्थन या आंदोलनाला मिळत आहे. देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन नवे रूप धारण करत आहे.
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ऋषिकेश शेटे यांनी फेसबुक वर पोस्ट केलेला व्हिडीओ –
सोनइ परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क ऊस ज्वलनाचा जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. या शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेले पत्रक पुढीलप्रमाणे –
‘आमच्या येथे शिवसेना मंत्री माननीय शंकरराव गडाख यांच्या अवकृपेने, आमच्या शेतीमधील अगदी रक्ताचे पाणी करून पिकवलेला ऊस आमच्या मालकीचा असलेला परंतु सध्या शिवसेना मंत्री माननीय शंकरराव गडाख साहेब आणि सुसंस्कृत राजकारणी माननीय यशवंतराव गडाख साहेब यांच्या ताब्यात असलेला मुळा सहकारी साखर कारखाना पंधरा महिने चकरा मारून देखील नोंद घेतलेली नसल्याने तोडून नेत नाही,
म्हणून सर्वप्रथम माझ्या शेतातील उसाचे आपल्या उपस्थितीमध्ये दहन करण्यात येणार आहे ही अडचण केवळ आमची नसून तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांची आहे. सहकारमध्ये राजकारण आणलं जातं सदर दहनविधीसाठी राज्यातील प्रमुख राज्यकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी, मान्यवर मंत्री यांनी उपस्थित राहावे ही विनंती. या प्रकारचा कार्यक्रम इथून पुढे ज्या शेतकऱ्यास अडवला त्याच्या शेतात ठेवण्यात येणार आहे.
“आमचे नेते पाणीदार आमदार! त्यांचे ब्रीद वाक्य, ऊसतोड आडवा, विरोधकाची जिरवा.”
निदान शेतातला ऊस जाळून राज्यकर्ता वर्गाला खडबडून जागे करण्याचा हा एक प्रयत्न आहे.’ ऋषिकेश शेटे या ऊस ज्वलन कार्यक्रमाचे आमंत्रण राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना देणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते लक्ष या विषयाकडे वेधनार आहेत. पंजाबातला शेतकरी आंदोलन करतो, म्हणून त्यांना समर्थन देणारे महाराष्ट्रातले नेते इथल्या शेतकऱ्यांनच्या उत्कर्षासाठी का काम करत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पंजाबातल्या शेतकऱ्यासाठी बोलतात मात्र त्यांच्याच महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे याकडे कसे दुर्लक्ष करतात, याबद्दल देखील त्यांनी रोष व्यक्त केला.
आता हे आंदोलन स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याला मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न ऋषिकेश शेटे करणार आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांमुळे त्रास झाला आहे ते शेतकरी रोज एक या प्रमाणे आपल्या शेतातील ऊस जाळणार आहेत.
पूर्ण तालुक्यातील 500 ते 1000 शेतकरी यात सहभागी होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ घातलेल्या या आंदोलनाची धग राज्यकर्त्या वर्गापर्यंत पोहोचेल का हा देखील एक प्रश्न आहे.