अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांनी पराभवाचे खापर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडले होते.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे तसेच शिवाजी कर्डीले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांचा पराभव झाल्यानंतर, या सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार केली गेली होती
आज या संदर्भात निकालानंतर पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले, माझी विखे पाटीलांबद्दलची नाराजी अजूनही कायम आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझी नाराजी कायम राहील.
आम्ही अहमदनगर मनपात जशी जादूची कांडी फिरवली होती तशी आम्ही जिल्हा परिषदेत फिरवू असं देखील कर्डिले यांनी म्हटलंय. राज्यात आमची सत्ता आली असती तर विखे यांच्या पत्नी भाजपात आल्या असत्या असा टोला कर्डिले यांनी लगावला आहे.