महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनमाणसांपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा फुले यांनी १८७० मध्ये प्रथम शिवजयंतीची सुरुवात केली.
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला.
शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.
त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूत करण्याचे काम केले. पुढे २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
शिवरायांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० ही असल्याचे संबंधित समितीने आपल्या अहवालात नमूद केले. तेव्हापासून देशातील ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, न्यायालय, संसद इत्यादी सर्व ठिकाणी शिवजयंती तारखेप्रमाणेच साजरी केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवस फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी महाराष्ट्रभर साजरा करतात.
महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.
इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.