अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना पक्षाने विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे.
गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहायचे.विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव गर्जे हे दुलेचांदगाव (ता. पाथर्डी, जि.नगर) चे रहिवासी आहेत.
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आलेले शिवाजीराव गर्जे हे पक्षात १९९९ पासून सक्रिय आहेत. माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात.
दिवंगत गुरुनाथ कुळकर्णी यांच्या पश्चात गर्जे हेच पक्षाचं प्रशासकीय कामकाज पाहत आले आहेत. त्यांनी निष्ठेने केलेल्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना पक्षाने विधानपरिषदेत धाडले आहे.
दरम्यान, या राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत ६ जून २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे गर्जे यांना सहा महिन्यांसाठीच विधानपरिषद सदस्यत्वाची संधी मिळणार आहे.
सहा महिन्यांसाठी आमदारकी असली तरी शिवाजीराव गर्जे यांच्यामाध्यमातून कार्यालयीन पदाधिकाऱ्याला विधानपरिषदेवर संधी दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत.