पुणे :- बेकरी मालकाच्या निष्काळजीपणामुळे अल्पवयीन बेकरी कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. शॉक लागल्यानंतर कामगाराला तातडीने रुग्णालयात न पोहोचवता तसेच झोपून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलाउद्दीन अन्सारी (१७) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शाहीद अब्दुलहक अन्सारी (५२, रा. कोंढवा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीद अन्सारीची नाना पेठेमध्ये फेमस नावाची बेकरी आहे. येथे मृत सलाउद्दीन इतर कामगारांसोबत काम करत होता.
मृत सलाउद्दीन, आदम व रियासत अन्सारी या कामगारांनी प्रॉडक्शन मशीनमध्ये करंट येत असल्याची माहिती मालक शाहीद दिली होती. मात्र, त्याने कुछ नही होगा, ऐसे ही काम करो, असे म्हणत तिघांनाही काम करण्यास भाग पाडले.
यानंतर आरोपीने स्वत: मशीन टेस्ट केली, कोणत्याही इलेक्ट्रिशियनला बोलावले नाही. मशीनमध्ये करंट येत असतानाही त्याने कामगारांना काम करण्यास भाग पाडले. दरम्यान, सलाउद्दीन अन्सारी हा शॉक लागून खाली पडला असता त्याला तसेच झोपवून ठेवण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी पाठवले नाही. यामुळे त्याचा मृत्यू झाला.