अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे .
एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळामध्ये ठेवून मंत्रप्रयोग करणार्या दोन मांत्रिकांना पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून रंगेहात अटक केली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.
राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला, मात्र अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कर्हे तलावली येथील एका घरात पालकमंत्री शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, पांढरा कोंबडा ठेवण्यात आला होता.
यावेळी मांत्रिक मंत्रोच्चार करून जादूटोणा करत असतानाच पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांचा फोटो लावण्यामागील उद्देश काय आहे? याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.