Sana Khan Murder : नागपूरच्या भाजप पदाधिकारी सना खान हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी व सना खानचा पती अमित साहू याला 5 मानकापूर पोलिसांनी शुक्रवारी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून अटक केली.
अमित साहूने त्याचा नोकर जितेंद्र गौड याच्या मदतीने सना खानचा खून करून तिचा मृतदेह मध्य प्रदेशच्या हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली. पैशाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी हत्येचे प्रमुख कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
नागपूरच्या अवस्थीनगर येथे राहणाऱ्या सना खान या २ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. सनाची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र तिचा मृतदेह मिळाला नसल्याने यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.
सना खान हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सना खानचा पती अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली होती. मात्र, अमित साहू फरार होता. अखेर शुक्रवारी पोलिसांनी या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व सना खानचा पती अमित साहू याला अटक केली.
अमित ऊर्फ पप्पू साहू हा जबलपूरमधील कुख्यात दारूमाफिया व वाळू तस्कर आहे.काही महिन्यांपूर्वी त्याची नागपूरला राहणाऱ्या सना खानशी ओळख झाली. त्यांनी लग्न केले. १ ऑगस्टला सना खान या अमित साहूला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या.
मात्र, यानंतर त्या नागपूरला परतल्याच नाही. त्यांचा मोबाईलदेखील बंद येत होता. याची तक्रार सनाच्या नातेवाईकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांना सनाचा पती अमित साहूवर संशय बळावला होता.
अखेर शुक्रवारी पोलिसांनी अमित साहूला अटक केली. २ ऑगस्टला सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची त्याने कबुली दिली. मात्र पोलिसांना अद्याप सनाचा मृतदेह मिळालेला नाही.