अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रवादीने भाजपाकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची निवड झाली.
भाजपा या वेळी समान मते होतील, या आशेवर होती. मात्र, त्यांच्याकडे आलेल्या विद्यमान सभापती या वेळी गैरहजर राहिल्याने भाजपचे संख्याबळ कमी पडले. राज्यात भाजपाला वगळून सर्वत्र महाविकास आघाडीचे वारे वाहत असताना कर्जत तालुक्यात मात्र शिवसेनेच्या एकमेव सदस्याने भाजपाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला.
निवडीप्रसंगी राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी सौ. अश्विनी श्यामराव कानगुडे यांनी तर उपसभापती पदासाठी हेमंत मोरे यांनी अर्ज दाखल केले. भाजपा- सेना युती कायम राहिली. त्यांच्यावतीने सभापतीपदासाठी सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांनी तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत यांनी अर्ज दाखल केला.
पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी अर्जांची छाननी झाली असता, चारही अर्ज वैध ठरले. त्यानंतर अर्ज माघारीच्या वेळेत सभागृहात आठ पैकी सातच सदस्य उपस्थित होते. यावेळी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या असलेल्या व सहा महिन्यांपूर्वी भाजपात जाऊन सभापती झालेल्या सौ. साधना कदम या अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपाचे संख्याबळ अपुरे राहिले.
यामध्ये भाजपाकडे दोन व सेनेचा एक, असे तीनच सदस्य राहिल्यामुळे भाजपा -सेनेच्या सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतले, यामुळे पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी सभापतिपदी सौ. अश्विनी शाम कानगुडे यांची तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
सभागृहात राष्ट्रवादीचे सदस्य राजेंद्र गुंड, मनीषा जाधव, तर भाजपाचे बाबासाहेब गांगर्डे हे सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रियेत नष्टे यांना गटविकास अधिकारी अमोल जाधव, कृषी अधिकारी रुपचंद जगताप यांनी मदत केली. निवड जाहीर होताच कानगुडे समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
निवडीप्रसंगी पो. नि. पवार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवड जाहीर होताच राष्ट्रवादीच्या समर्थकांनी सभागृहात सत्कार केला. या वेळी जि. प. समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शाम कानगुडे, नितीन धांडे, मनीषा सोनमाळी, ॲड. सुरेश शिंदे, नाना निकत, ज्ञानदेव सायकर, ऋषिकेश धांडे, आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांपूर्वी भाजपाने राष्ट्रवादीचा एक सदस्य आपल्याकडे ओढून त्यांना थेट सभापती करत सत्ता राखली होती. दरम्यानच्या काळात कोरेगाव पंचायत समिती गणात भाजपच्या सदस्यांना पराभूत करून राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव निवडून आल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. आज पंचायत समितीचे बलाबल पाहता दोन्ही बाजूंकडे चार सदस्य असल्याने पुन्हा चिठ्ठीद्वारे निवड होते का, याची उत्सुकता होती.
दरम्यान, सकाळपासून दोन्ही बाजूने आपल्याकडे पाच सदस्य असल्याचा दावा केला जात होता. मात्र, ऐनवेळी भाजपच्या गोटातील सौ. साधना कदम यांना अनुपस्थित ठेवून राष्ट्रवादीने भाजपावर कडी केली व आपले पदाधिकारी बिनविरोध केले. यामुळे विधानसभेनंतर भाजपाला हा दुसरा धक्का असून, आ. रोहित पवार यांच्या करिष्मा पहायला मिळत असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत.