अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने पोल्ट्री फिड मिलला आग लागून मशिनरी, साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला. या आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले.
मंगळवारी (दि. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चिंचोलीगुरव शिवारातील गट क्र. २४५ मध्ये तुकाराम सखाहरी सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात पोल्ट्री फार्म आहे. नजीकच त्यांच्या आई मंजुळाबाई सखाहरी सोनवणे यांच्या नावे असलेली पोल्ट्री फिड मिल आहे. मंगळवारी (दि. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्टसर्किटने या पोल्ट्री फिड मिलला अचानक आग लागली.
आगीत गोडावूनमधील फिड मिल मशिनरी, जनरेटर, १२ टन सोया, ८० टन मका, डीओआरबी पावडर, मार्बल, औषधे, पोल्ट्री फार्मचे खाद्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले. आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. पोल्ट्री फिड मिलला आग लागल्याचे कळताच तुकाराम सोनवणे, संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सरपंच योगेश सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, रोहिदास सोनवणे, संजय खिलारी, डॉ. सुहास आभाळे, विलास सोनवणे, नामदेव सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक रहिवासी व युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर थोरात साखर कारखाना व संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलांमार्फत आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत मशिनरी व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत झालेल्या नुकसानीची थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी पाहणी केली.
याप्रकरणी तुकाराम सोनवणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जळीताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.