अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत स्तरावर काम करताना स्वच्छता, पाणी आणि शिक्षण या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमागे चार झाडे लावली पाहिजेत.
पर्जन्यमान झाडांच्या संख्येवर अवलंबून असून ‘झाडं ही पावसाची एटीएम’ आहेत, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘माणसात देव आहे’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना पेरे पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे.
त्यामुळे २५ वर्षे ग्रामपंचायतीमध्ये काम करताना कामातच देव पाहिला. गावाने सलग २५ वर्षे माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी काम करू शकलो, पाच वर्षांत सगळी ग्रामपंचायत समजत पण नाही.
मी ग्रामपंचायतीत आलो तेव्हा गावात अगदी भीषण परिस्थिती होती. परंतु, आमचे ग्रामस्थ चांगले असल्याने कामाला गती मिळाली. सध्या राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत.
निवडून कोण आले हे महत्त्वाचे नसून निवडून आलेली व्यक्ती काम करणार हे ठरवणे महत्वाचे आहे. नव्या सदस्यांनी जागरूकपणे काम करणे गरजेचे आहे. पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला पाहिजे.असेही ते म्हणाले.