Maratha Reservation : शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न : जरांगे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Reservation : मराठा समाजाची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून, शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही, मराठा तरुणांनी उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नाहीत, शेती परवडत नाही, त्यामुळे शिक्षणाचा खर्च करणे जिवापार झाले आहे, अशा परिस्थितीमुळे संपूर्ण मराठा समाज हातबल झाला आहे,

आर्थिक दृष्ट्या मराठा समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे, त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजबांधवांचे पाठबळ आणि आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शनिवारी केले.

या वेळी मराठा समाजबांधवांनीजरांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. जरांगे पाटील यांचे तिसगावमध्ये आगमन होताच काही क्षणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण पटांगण हाऊसफुल्ल झाले होते.

एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी संपूर्ण तिसगाव परिसर दणाणून गेला होता. या वेळी उपस्थित महिला भगिनींच्या वतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.

या वेळी जरांगे म्हणाले की, आरक्षण मिळवण्यासाठी आमच्याकडून लागणारे सर्व कागदपत्रे सरकारकडे सादर केले आहेत, मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची तयारी महत्त्वाची आहे. मराठा समाजाची सध्याच्या परिस्थितीत पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळाले तरच मराठा समाज कुठेतरी तग धरून राहील.

शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहील, त्यासाठी तुमचा विश्वास आणि त्यासाठी तुमचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहेत, असे भावनिक आवाहन जरांगे यांनी या वेळी केले.