Maharashtra News : तलाठी भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्र मॅनेज होणे, पेपरफुटीसारख्या घडलेल्या गैरप्रकारांमुळे राज्यातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
त्यामुळे तलाठी भरती प्रक्रियेतील या गैरप्रकारांची सरकारने विशेष चौकशी पथका (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पाटील यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, तलाठी परीक्षेदरम्यान सर्व्हर बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्याच दिवशी घडलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली.
नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली. या ठिकाणी परीक्षा केंद्र मॅनेज करण्याचा प्रकारदेखील निदर्शनास आला आहे. नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याचे समजते.
यापूर्वी वनविभागाच्या भरतीसंदर्भातदेखील असेच प्रकार घडले होते. म्हाडा भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या ६० आरोपींवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. राज्यात वारंवार घडणाऱ्या या गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे.
त्यामुळे सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन एसआयटीमार्फत चौकशी करण्याची गरज आहे. तसेच शासकीय गट ‘क’ व गट ‘ड’ पदांची भरती पारदर्शकपणे होण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करावी.
याकरिता केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या धर्तीवर राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन करावा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्येच गट ‘क’ व गट ‘ड’ पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यामार्फत या पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.