उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख (२३) याने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, यशश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती, याच कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले व दाऊदने तिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचे तपासात निषन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
बुधवारी सकाळी आरोपीला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही काळे यांनी सांगितले. दाऊद व यशश्री दोघेही शाळेमध्ये एकत्र शिकत होते. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली.
मात्र, यशश्री पुढे शिक्षण घेत होती. दाऊदने त्यानंतर चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये त्याने यशश्रीची छेड काढल्याने कुटुंबीयांनी दाऊदविरोधात विनयभंग व पॉक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात तो दीड महिने जेलमध्ये होता. त्यानंतर जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर कोरोनाच्या काळात बंगळुरूला गेला. त्यानंतर तो यशश्रीला कॉल करून तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान तो यशश्रीला भेटण्यासाठी उरणमध्ये दोन-तीन वेळा कर्नाटक येथून आल्याचे तपासात आढळले.
यशश्रीला बंगळुरूला नेण्यासाठी तगादा :
दाऊदला उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूस असलेल्या झुडपामध्ये यशश्री भेटल्यानंतर त्याने पुन्हा तिला लग्न करून बंगळुरू येथे येण्याबाबत विचारणा केली.
मात्र, लग्नास आणि बंगळुरूला येण्यास तिने नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर दाऊदने आपल्या सोबत आणलेल्या चाकूने पोटावर आणि पाठीवर वार करून यशश्रीची हत्या केल्याचे तपासात आढळून आले
फोटो व्हायरल करण्याची धमकी
२३ जुलैला दाऊद कर्नाटक येथून उरणमध्ये आला होता. तो तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. भेटायला न आल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे २४ जुलैला यशश्री जुईनगर येथे दाऊदला भेटली.
त्यावेळी त्याने यशश्रीला लग्न करून त्याच्यासोबत बंगळुरू येथे राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र, ती नकार देत होती. त्यामुळे दाऊदने २५ जुलैला पुन्हा तिला भेटण्यासाठी बोलावले,
मात्र ती भेटण्यास न गेल्याने त्याने यशश्रीचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले. मात्र ती २५ जुलैला भेटल्यानंतर त्याने ते फोटो डिलीट केले.