…तर खासदार सुजय विखे देणार खासदारकीचा राजीनामा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे सुरू असलेले उपोषण अखेर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सुटले आहे. या कामगारांना तातडीने एक पगार देण्याचे आश्वासन डॉ. विखे यांनी कामगारांना आश्वस्त केले.

थकीत पगार मिळावेत, प्रॉव्हीडंट फंड व ग्रॅज्युईटी मिळावी या मागणीसाठी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी तसेच निवृत्त कामगारांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. याबाबत अनेकांनी त्यांच्याशी चर्चा करून देखील या कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले नव्हते. मात्र आज कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या मध्यस्थीने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

यावेळी सुरुवातीला सुरेश थोरात यांनी खा. सुजय विखे पाटील यांना माहिती देताना सांगितले की, कामगारांना पगार नसल्याने कामगारांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत आपण मार्ग काढू शकता. यात आम्हाला शंका नाही. बंद पडलेला कारखाना डॉ. विखे पाटील यांनी सुरू केला, याची देखील आम्हाला कल्पना आहे. मात्र आमचेही आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, तर आमच्या पोटासाठी सुरू आहे. डॉ. विखे यांनी आमचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांनीच यातून मार्ग काढावा. आम्ही सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत आहोत.

निसर्गाचीच साथ नसल्याने कारखाना बंद ठेवण्याची वेळ

यावेळी कामगार युनियन अध्यक्ष ज्ञानदेव आहेर म्हणाले की, खा. डॉ. विखे पाटील यांनी नेहमीच कामगारांना साथ दिली आहे. मात्र यंदा निसर्गाचीच साथ नसल्याने कारखाना बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळेच हा प्रसंग सर्व कामगारांवर ओढवला आहे. यावेळी अर्जुनराव दुशिंग, इंद्रभान पेरणे, चंद्रकांत कराळे यांनीदेखील कामगारांच्या व्यथा खा. विखे यांच्यासमोर मांडल्या.

कामगारांवर उपोषणाची वेळ यावी ही दुर्दैवी बाब !

त्यानंतर बोलताना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, खरंतर कामगारांवर उपोषणाची वेळ यावी ही दुर्दैवी बाब आहे. हा कारखाना चालविण्यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे. आमच्या काळामध्ये कामगारांची जी देणी शिल्लक आहेत, त्यामध्ये थोडेफार मागेपुढे होऊ शकते. मात्र या तालुक्याने दिलेले प्रेम आम्ही विसरू शकत नाही. कामगारांचा एकही रुपया आम्ही बुडू देणार नाही.

तर मी खासदारकीचा राजीनामा देईन – खा. सुजय विखे पाटील

राहुरी असो किंवा गणेश कारखाना असो हे दोन्ही कारखाने मला माझ्या कुटुंबासारखे आहेत. मात्र, यंदा मला हे कारखाने बंद ठेवावे लागले. कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने व तत्कालीन आमदारांनी मोठी मदत केली होती. या अडचणी आपल्या कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे आपण एकत्र बसूनच त्यातून मार्ग काढला पाहिजे. मी कारखाना हाती घेतल्यापासून अनेक जुनी देणी आम्ही दिलेली आहेत. यात एका रुपयाचा देखील भ्रष्टाचार कोणी सिद्ध केला तर मी खासदारकीचा राजीनामा देईन.

सर्वच कारखान्यांच्या कामगारांचे पगार थकलेलेत

यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने सर्वच कारखान्यांच्या कामगारांचे पगार थकलेले आहेत, ही वास्तविकता आहे. मात्र, कामगारांच्या वेदना मी समजू शकतो. वास्तविकता सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे. उगाच काहीतरी सांगून कामगारांच्या व आमच्या भावनेशी कोणी खेळू नका. संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही.

राजकारण करण्याचे व्यासपीठ नाही !

हे राजकारण करण्याचे व्यासपीठ नाही. आम्ही लवकरच यातून मार्ग काढू. आज कामगारांचा एक पगार त्यांना दिला जाईल व २० जानेवारीपर्यंत दोन लेऑफचे पगार व १ पगार कामगारांना अदा करण्यात येतील. त्याबाबत शिष्टमंडळाशी चर्चा करून त्याच्या स्वरुपाची लेखी देखील आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. त्याचबरोबर यापुढे अशा कोणत्याही आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24