तर आम्ही नगरसेवकाच्या घरी शौचास जाऊ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात सर्वत्र स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे.

शहर ते गाव खेडी या ठिकाणी सरकारच्या वतीने शौचालये उभारली जात आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र, आहे ते शौचालय पाडल्याने नागरिकांची कुचंबणा झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नवघरगल्ली परिसरातील सुलभ शौचालय पाडल्याने परिसरातील अनेक नागरिकांची दोन दिवसांपासून गैरसोय झाली आहे.

संगमनेर नगरपरिषदेने दोन दिवसांपूर्वी नवघर गल्ली परिसरातील इंदिरा गांधी गार्डन जवळील हे जुने शौचालय पाडले होते. याठिकाणी भाजी मार्केट बांधण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असून यासाठी हे शौचालय पाडून टाकण्यात आले आहे. नगरपालिकेने या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या

मोबाईल शौचालयाचा अनेक महिलांना वापर करता येत नसल्याने हे शौचालय कूचकामी ठरले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने शौचालय पाडल्यानंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. त्वरीत नवीन शौचालय बांधून आमची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

यावेळी प्रभागातील नगरसेवक किशोर टोकसे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे शौचालय पाडण्यास भाग पाडल्याचा आरोपही काही महिलांनी केला होता. शौचालय न बांधल्यास आम्ही नगरसेवकाच्या घरी शौचास जाऊ, असा इशारा संतप्त महिलांनी दिला होता.

शहरातील सर्वांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत.नवघर गल्ली परिसरातील शौचालयाचा वापर अवघे चार ते पाच कुटुंबीय करत होते त्यांनाही नगरपालिकेने शौचालयासाठी अनुदान दिले असून त्यांनी शौचालय बांधले नसल्याचे नगराध्यक्षा सौ. तांबे यांनी सांगितले.

प्रत्यक्षात मात्र या नागरिकांची अवस्था वेगळी आहे.छोटी घरे व कमी जागा यामुळे हे नागरिक शौचालय बांधू शकत नसल्याचे चित्र आहे.नगरपालिकेने या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्वरीत शौचालय बांधण्याची गरज आहे.

माजी नगरसेवकांचा विरोध :- संगमनेर नगरपालिकेने हे शौचालय पाडल्याने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे व कैलास वाकचौरे यांनी पालिकेच्या या कृतीस विरोध दर्शविला आहे. शौचालय पाडण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते.

शौचालय पाडण्यास आपला विरोध असून नागरिकांच्या आंदोलनास आपला पाठिंबा राहील असे कर्पे यांनी सांगितले. संगमनेर शहरात शौचालयाची सुविधा नसल्याने महिलांची गैरसोय होत आहे. महिला नगराध्यक्षा असतानाही अशी वेळ येणे हे दुर्दैवी असल्याचे वाकचौरे म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24