Maharashtra News : काही जण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाव न घेता खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका राज यांनी घेतली. उद्धव यांनी यावरून त्यांना लक्ष्य केले.
दरम्यान, भाजपच्या इंजिनाची चाके निखळली असल्याचा खोचक टोलाही उद्धव यांनी यावेळी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीकडून देखील राज यांच्या निर्णयाचा समाचार घेतला जात आहे.
मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी शनिवारी नाव न घेता राज यांनी घेतलेल्या निर्णयावरून शाब्दिक टोले लागवले. बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही कौतुक करतो, परंतु काही जण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या लवकरच महाराष्ट्रभर सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीवर टीकास्त्र
महायुतीत अद्याप जागावाटप ठरलेले नसताना जाहीर सभा सुरू आहेत, या प्रश्नावर उद्धव यांनी, महायुतीचा अद्याप फॉर्म्युला निश्चित नाही. उमेदवारांचा कुठेही पत्ता नाही आणि सभा होत आहेत, याला काही अर्थ नाही, असे सांगत महायुतीवर टीकास्त्र डागले.
भाजप भाड्याने लोक का घेत आहेत. त्यांच्या इंजिनाची चाक निखळून पडली असून, स्टेपनीवर ते जात आहे का? त्यांची ओरिजिनल लोक कुठे गेलीत?, असा सवाल ठाकरेंनी केला. सध्या भाजपची बहुतांश लोक शिवसेनेत (ठाकरे) येत आहेत. भाजपच्या नेतृत्व आणि विचारधारेला ती कंटाळली आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.