अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- आगामी काळात रेल्वेचे तिकिट बुकिंग करण्याची पद्धत सोपी आणि जलद होऊ शकेल. रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय रेल्वे अन्न व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) ई-तिकीट वेबसाइट आणि अॅपचे अपग्रेड केले आहे.
वास्तविक, अलीकडेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ई-तिकीट प्रणालीसाठी केलेल्या कामांच्या अपग्रेडेशनचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी ई-तिकीट वेबसाइटवर रेल्वे प्रवासाशी संबंधित प्रवाश्यांसाठी पूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार नव्या वर्षात आयआरसीटीसीची नवी वेबसाइट लाँच झाली आहे. IRCTC च्या नवीन वेबसाइटसाठी कोणतंही वेगळं डोमेन नाहीये, तुम्ही www.irctc.co.in या जुन्या डोमेनवरतीच लॉग-इन करु शकणार आहात. या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांसाठी तिकिट बुकिंगचा सहज अनुभव घेता येईल. त्याशिवाय रेल्वेकडून तिकिट आरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे.
त्याशिवाय तिकिट उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी आणखी एक ‘कॅचे सिस्टम’ आणली गेली आहे. ज्याद्वारे उपलब्धता समजण्यात होणारा विलंब टळेल असा दावा रेल्वेने केले आहे. अपग्रेडेड वेबसाइटमुळे तिकीट आरक्षण आणि तिकीट रिफंड प्रक्रीया सहज आणि कमी वेळेत पार पडेल असा दावा करण्यात आला आहे.
आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बूकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात. नव्या वर्षापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर खाद्य पदार्थांची सुविधाही मिळेल.
तसेच, तात्काळ तिकीट आरक्षण करताना आयआरसीटीसीची वेबसाइट आता हँग होणार नाही. वेबसाइट अधिक जलद होणार असून विशेष म्हणजे आता एकाच वेळी 5 लाख प्रवासी लॉग-इन करु शकणार आहेत.
या अशा बेस्ट-इन-क्लास सारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या या सुधारित ई-तिकीट वेबसाइट आणि अॅपचे उदघाटन शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या दृष्टिकोनातून आयआरसीटीची वेबसाईट अद्ययावत करण्यात आली आहे.