अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपवासीय झाले होते.
निवडणुकीनंतर राज्यात चमत्कार घडला. राज्यात काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकार स्थापनेनंतर आज मांजरीत एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.
त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे ठणकावून सांगितले आहे.
मांजरी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील आल्यानंतर पवार भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या.
पवारांनी मोहिते पाटील यांना जवळ बोलावून घेत खुर्ची बसण्यासाठी दिली, तसेच बराच वेळ त्यांच्याबरोबर चर्चाही केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र या पितापुत्रांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही.
पत्रकारांनी मोहिते पाटलांना विचारले असता, मी राष्ट्रवादीतच आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.