Maharashtra News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हरियाणाच्या महिला शेतकऱ्यांशी दिलखुलास गप्पा मारताना, आपल्या मुलासाठी अर्थात राहुल गांधीसाठी मुलगी शोधण्यास सांगितले. गप्पा मारत असताना एका महिलेने सोनियांना राहुल गांधी यांचा विवाह करण्याचा सल्ला दिला.
यावर सोनियांनी आधी तुम्ही मुलगी तर शोधा, असे उत्तर दिल्यानंतर सर्वांमध्ये एकच हशा पिकला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या हरियाणा दौऱ्यात दिलेल्या दिल्ली भेटीच्या निमंत्रणानुसार या महिला सोनिया गांधी यांच्या घरी आल्या होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच हरियाणा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या दौऱ्यात हरियाणातील महिलांनी दिल्ली पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना दिल्ली भेटीचे व आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार हरियाणातील महिला सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ’ निवासस्थानी दाखल झाल्या होत्या.
या भेटीचा लहान व्हिडिओ ट्विटर आणि पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर राहुल गांधी यांनी टाकला आहे. आई, प्रियंका आणि माझ्यासाठी एक संस्मरणीय दिवस, काही विशेष पाहुण्यांसोबत. सोनिपतच्या शेतकरी भगिनींचे दिल्लीदर्शन, त्यांच्यासोबत घरी जेवण आणि खूप साऱ्या गप्पा. सोबत त्यांच्याकडून मिळालेल्या देशी तूप, गोड लस्सी, घरगुती लोणचे यांसारख्या अनमोल भेटवस्तू आणि खूप सारे प्रेम’, असे ट्विट त्यांनी केले.
या व्हिडिओत हरियाणाच्या महिला सोनिया गांधी, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारत भोजन करताना दिसून येत आहेत. यावेळी एका महिलेने सोनियांना राहुल गांधी यांचा विवाह करण्याचा सल्ला दिला. यावर सोनियांनी तुम्ही मुलगी तर शोधा, असे उत्तर दिले. यावर राहुल गांधींनी देखील ‘असे होऊ शकते’ असे म्हणत त्यात होकार मिळवला. यानंतर उपस्थित महिलांमध्ये एकच हश्या पिकला हलक्या फुलक्या वातावरणात या गप्पा पार पडल्या.