अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने खूप मदत केली. त्यामुळे त्याचं कौतुकही झालं आणि त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? यावर संशय व्यक्त करण्यात आला.
मात्र सोनू सूदने लोकांना मदत करता यावी यासाठी आपल्या ८ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. या ८ मालमत्ता गहाण ठेऊन त्याने १० कोटींचं कर्ज घेतलं आणि गरिबांना मदत केल्याची माहिती मिळाली आहे.
जुहू येथील पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील ८ मालमत्ता सोनूने गहाण ठेवल्या आहेत जुहू येथील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट याचा त्यात समावेश आहे.
ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.
या मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून १० कोटीचं कर्ज घेतलं आहे. त्याने १० कोटींचं कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरलं आहे.
यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावरही आहेत. मात्र, सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
सोनूने चंदीगडमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी स्मार्टफोनचे वितरणही केले होते सोनूच्या या कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.